वीज ग्राहकांचे हक्क पुस्तक प्रकाशन समारंभ संपन्न
इचलकरंजी. "वीजेच्या संदर्भातील अनेक प्रश्न व समस्या आज वीज ग्राहकांसमोर आहेत त्या समजून घेण्यासाठी सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांनी अधिक जागरूक होण्याची आवश्यकता आहे, तरच त्यांचे प्रश्न सुटण्यासाठी मदत होऊ शकेल." अशा आशयाची भूमिका 'वीज ग्राहकांचे हक्क' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभावेळी सर्व प्रमुख वक्त्यांनी मांडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील हे होते आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांच्या शुभ हस्ते पुस्तक प्रकाशन समारंभ संपन्न झाला. महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष व वीजतज्ञ प्रताप होगाडे यांनी सदरचे पुस्तक लिहिले आहे…आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना प्रा. शरद पाटील यांनी "संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी वीज ग्राहक संघटना कार्यरत असून त्यांच्या या माहितीपूर्ण पुस्तकामुळे सर्व वीज ग्राहकांना आता अधिक फायदा होईल. वीज ग्राहक जनतेसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरणारे आहे. ग्राहकांनीही आपल्या अधिकाराविषयी जागरूक राहायला हवे.'' अशा आशयाचे उद्गार काढले…
त्यापूर्वी या प्रसंगी बोलताना ललित गांधी गांधी यांनी "वीज ही आज आपल्यासाठी जीवनावश्यक गोष्ट आहे पण त्याबाबत कायदेशीर माहिती नसल्याने आपणास अनेक अडचणी येतात. 10 टक्के वीज ग्राहक जरी जागरूक झाले तर फार मोठा व चांगला बदल होऊ शकेल. या पुस्तकात अतिशय उपयुक्त माहिती असून त्यामुळे ग्राहकांना आपले हक्क समजतील.'' अशा आशयाचे विचार व्यक्त केले. महाराष्ट्रात वीजेचे दर जास्त असल्याने उद्योगधंद्यात वाढ न होता घसरण होत आहे, याबाबत चिंता व खंतही गांधी यांनी यावेळी व्यक्त केली…
प्रकाशन कार्यक्रमात लेखक या नात्याने प्रताप होगाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. "घरगुती, शेतकरी, व्यापारी आणि औद्योगिक अशा सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांमध्ये हवी तितकी जागरूकता नाही, ती वाढायला हवी. अनेक नवीन गोष्टी वीज कायद्यात आल्या आहेत व काही नवीन येऊ घातल्या आहेत त्याची माहिती देणे, वीज ग्राहकांच्या न्याय्य मागण्यासाठी चळवळ करणे, प्रयत्न करणे, जागरूकता निर्माण करणे आणि आपल्या न्याय्य हक्कासाठी लढण्याची प्रेरणा देणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे'' अशा आशयाचे उद्गार त्यांनी काढले. वीजेच्या संदर्भातील सर्व सरकारी यंत्रणा व नियामक आयोगास ग्राहकांच्या हिताची काळजी नसल्याने ग्राहकांनी आपल्या हक्कासाठी लढायला हवे अशी अपेक्षाही यावेळी होगाडे यांनी व्यक्त केली…
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. वीज ग्राहक संघटनेचे उपाध्यक्ष व पुस्तक प्रकाशक शाहीर विजय जगताप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी समाजवादी प्रबोधिनीचे चिटणीस व लेखक प्रसाद कुलकर्णी यांनी पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त केले. स्वागत व पाहुण्यांचा परिचय संजय होगाडे यांनी करून दिला. यावेळी ग्राहक गार्हाणे निवारण मंचाचे माजी सदस्य प्रसाद बुरांडे आणि विश्वनाथ मेटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीज ग्राहक संघटनेचे सचिव जाविद मोमीन यांनी केले तर शेवटी संचालक मुकुंद माळी यांनी आभार प्रदर्शन केले. इचलकरंजी येथील समाजवादी प्रबोधिनी सभागृहात झालेल्या कार्यक्रमास इचलकरंजी, सांगली, कोल्हापूर भागातील वीज ग्राहक आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते…